आयुष्यात काही क्षण अगदी सहज घडून जातात पण खूप काही सांगून जातात.. मनाला एक दिलासा देऊन जातात.. एक नवा आशावाद जागवतात..
एका प्रकल्पाच्या कामासाठी काही पुस्तकांचे संदर्भ हवे होते.. ग्रंथपाल प्रसाद भडसावळे हा मदतीसाठी कायम तत्पर असणारा माणूस.. ते म्हणाले, मी ज्या शाळेत सकाळी असतो तिथे आलात तर तुम्हाला हवी ती पुस्तके व हवे ते संदर्भ घेऊन जा.. सकाळी १० वाजता मी आबासाहेब अत्रे दिन प्रशालेमध्ये पोचलो.. बाहेरचं धावता जग आणि शाळेत शिरल्यापासून जाणवणारं जग खूप वेगळं होतं त्याहून जेव्हा मी ग्रंथालयात गेलो तेव्हा तिथले वातावरण मला खूप भावले.. विषयानुसार, व्यक्तीनुसार पुस्तके कपाटात व्यवस्थित लावलेली होती.. काही हजार पुस्तके, सर्व प्रमुख संदर्भ ग्रंथ या शाळेच्या ग्रंथालयात पाहायला मिळतील असे बाहेरून वाटणार पण नाही.. पण मला तिथे भावलेली गोष्ट खूप वेगळी होती.. कारण सकाळपासूनच ग्रंथालयात मुलांची वर्दळ होती.. कुणी वर्तमानपत्र वाचण्यात गढले होते तर कुणी अगदी प्रामाणिकपणे कात्रणे काढून त्या त्या विषयाची वही चिकटवून तयार करत होते.. अनेक जण पुस्तके वाचण्यामध्ये मग्न झालेली दिसत होती.. ते वातावरण कुणालाही पाहून छान वाटावे असेच होते.. मला हवी असणारी संदर्भाची पुस्तके भडसावळे यांनी काढून दिली. एका पुस्तकाचे काही संदर्भ घेण्यासाठी मला त्याच्या xerox हव्या होत्या... माझा वेळ वाचवा म्हणून त्यांनी एका चुणचुणीत मुलाला आवाज दिला.. पुस्तकाची जेवढी पाने हवी होती ते क्रमांक मी त्याला लिहून दिले. त्यासाठी दहा रुपयांची एक नोट त्याच्याकडे दिली.. तो गेला. पंधरा मिनिटात परत आला. मला हवी असलेली पाने त्याने हातात दिली.. भडसावळे यांचे आभार मानून मी ऑफिसला परत आलो.. एव्हाना सकाळचे बारीक सारीक तपशील मी केव्हाच विसरून गेलो होतो..
...................................................................................................................................................................
संध्याकाळी मला भडसावळे पुन्हा दिसले.. त्यांनी मला हाक मारून थांबवले आणि माझ्या हातात २ रुपयांचे नाणे ठेवले.. म्हणाले.. सकाळी तो मुलगा xerox काढायला गेला होता. तुम्ही गेल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि आपण उरलेले पैसे दिले नाहीत. तेव्हा त्याने ते पैसे माझ्याकडे दिले आणि म्हणाला सरांना हे पैसे आठवणीने द्या नाहीतर त्यांचा गैरसमज व्हायचा...''
दोन मिनिटे मला ते पैसे घ्यावे कि न घ्यावे हे सुचेना. पण नंतर मला त्या मुलाच्या वृत्तीचे खूप कौतुक वाटले.. मी त्या मुलाला त्यावेळी पैशांचा हिशोब विचारला नव्हता.. परत काही पैसे येणार आहेत हे माझ्या ध्यानी मनी पण नव्हते..दिवसभराच्या धबडग्यामध्ये हे असले काही मनात पण नव्हते.. पण त्या मुलाचे मात्र मला मनापासून कौतुक वाटले.. मी मुद्दाम त्याचे नाव विचारले. सौरभ परदेशी हा इयत्ता ७ वीत शिकणारा मुलगा.. गरीब कुटुंबातून आला असला तरी या प्रसंगातून त्याचा प्रामाणिकपणा दिसून आला.. पैशापलीकडे काही असते आणि तेच महत्वाचे हा संस्कार निदान लहानपणी तरी त्याच्या मनावर कोरला गेला होता..
...................................................................................................................................................................
ते दोन रुपये मी आजही जपून ठेवले आहेत...!!
अजून सारेच संपले नाही हा दिलासा ते दोन रुपये मला देतात..!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा