फॉलोअर

शनिवार, २५ जून, २०११

एवढंसं आभाळ...!



घराशेजारी उभं राहत असलेलं एक घर... त्या घराच्या भिंती उभ्या राहताना त्याची देखभाल करण्यासाठी पत्र्याची झोपडी उभारून अनेक महिन्यापासून आमचे शेजारी बनून राहिलेलं एक कुटुंब! आई, वडील आणि दोन चिमुकली भावंड. जेमतेम ८ बाय १० मध्ये उभारलेला संसार..
घरभर... रस्त्यावर दिवसभर फिरणारी त्याची चिमुकली पावले.. पायरीपाशी पसरलेल्या रेतीमध्ये दिवसभर मनसोक्त खेळणं... आसपासच्या बंगल्यातली पोर खेळण्यांशी कशी खेळतात हे गेटवर उभं राहून पाहत राहणं... रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यामागे उगीचच पळत राहणं.. काळ्या पडून स्वतःचा रंग हरवून बसलेल्या बशीत काहीतरी खाणं... लाकडं तोडणार्या बापाच्या मागे पुढे उगीच घोटाळत राहणं.... हातगाडीवर विकायला येणाऱ्या वस्तूंकडे आशाळभूतपणे पाहत राहणं.... आणि चुकून आई किंवा बाप मेहेरबान झालाच तर स्वर्गीय आनंद देणारी कुल्फी अगर गार गार बर्फाचा गोळा अंगभर पसरेपर्यंत खात राहणं... दिवसभर हुंदडून दमल्यावर जमिनीवरच पसरलेल्या टोचणार्या चादरीवर शांत झोपूनही जाण...
या सगळ्या बालविश्वामध्ये सर्वात जिवाभावाची आणि नेहमी सोबत असणारी एक पाय मोडलेली खेळण्यातली सायकल. झोपतानाही शेजारीच पहुडलेली असायची... मित्र नव्हतेच पण त्या सायकल बरोबर काही वेगळे नाते जुळलेले असावे...
परवा सोसायटीमध्ये भंगारवाला आला... नेहमी येतो तोच... रोज दिसणाऱ्या या छोट्या कडे पाहत तो गमतीने म्हणाला, काय रे, नेऊ का तुझी हि सायकल..??''
एकदम कुणीतरी गळा पकडावा तसं अस्वस्थ होत त्याने सायकल मागे घेतली आणि काही झाले तरी सायकल मिळणार नाही हा निर्धार कृतीतूनच सांगितला.. भंगारवाला नजरेआड होईपर्यंत मुलाने त्याह्च्यावरून नजर हळू दिली नाही आणि सायकलवरची पकडही तितकीच घट्ट ठेवली होती... पुढच्या वळणावर जाऊन भंगारवाला परत आला... भंगारवाल्याचा आवाज ऐकून झोपडीतून त्या मुलाची आई बाहेर आली... मुलाचं लक्ष नाही हे पाहून तीच सायकल समोर एका हातात उचलून धरत म्हणाली, '' किती देणार याचे?'' १५ कि २० रुपये यावर थोडीशी घासाघीसही झाली.. अखेर २० नक्की ठरले आणि ती सायकल भंगाराच्या गाडीवर ठेवली गेली... तो छोटं मुलगा मात्र कोपर्यात उभं राहून हे सारं पाहत होता.. डोळ्यामध्ये प्रचंड काकुळता आणि कारुण्य दाटले होते.. आईसमोर जाऊन भांडून, रडून का होईना सायकल परत मिळवावी असे वाटत होते पण यातले त्याने काहीच केले नाही.. आश्चर्यही वाटले आणि वाईटही... मगाशी गमतीने भंगारवाला जे म्हणत होता ते आता खरेच घडत होते या सगळ्याचा किती गोंधळ त्या कोवळ्या मनात उठला असेल हे समजायला मार्ग नव्हतं... आईच्या हातावर २० रुपयांची नोट टेकवून भंगारवाल्याने गाडी पुढे घेतली... दारामागे लपून पाहणारी चिमुकली पावले मला उगीचच थरथरल्यासारखी भासली... आईचा धाक होता कि काय माहीत नाही पण आई फिरून झोपडीत शिरेपर्यंत ते पोरगं काही बाहेर आलं नाही. आईची पाठ फिरल्यावर मात्र गाडीवरची नजर हलू ना देता वेगात बाहेर आलं... आणि भंगाराची गाडी पुढे जात असताना हताशपणे पाहत उभं राहिला होतं... भंगारवाला निघून गेला.. छोट्याशा तळहातानी स्वताचेच डोळे पुसले असल्याचा मला लांबून भास झाला...
जमिनीवरच अंथरलेल्या त्या चादरीवर त्या चिमुकल्याला रात्री झोप लागली असेल का हा प्रश्न माझ्या मनात अनुत्तरीतच राहिला....

सोमवार, २० जून, २०११

बाबा!!!

आज बरोबर दीड महिना झाला... सतत अस्वस्थतेचं धनी बनून राहणं म्हणजे काय हे मी या काळात अगदी जवळून अनुभवला... अजूनही अनुभवतोय... आयुष्य हे विविधरंगी असतं.. पण कधी कधी अचानक काळे ढग दाटून यावेत ना तसंच तो दिवस असावा... मी नेहमीसारखा ऑफिसच्या कामात गढून गेलेलेला... काळ, वेळ हे सारे संदर्भ जिथे विसरून जातात अशा विश्वात मी रमलेला... अचानक फोन वाजला.. अगदी यांत्रिकतेने फोने उचलला आणि पलीकडून आवाज कानावर अक्षरश आदळला... बाबांना अपघात झालाय!!! मोठा आवाज कानावर अचानक पडल्यावर काही क्षण जसे कान आणि मन सुन्न होऊन जातं ना.. अगदी तसेच क्षण होते... पायाखालची जमिन सरकणं काय असावं याचाही अनुभव त्या काही गोंधळलेल्या क्षणांनी दिला... दोन मिनिट स्वताला सावरला आणि घराकडे वेगाने सुटलो... ऑफिस पासून घर किती लांब आहे हे पहिल्यांदा जाणवत होता... रस्त्यावरचा सिग्नल पाहत नव्हतो कि आजूबाजूची मानसं...विचारांनी गच्च भरलेला डोकं आणि डोळ्यासमोर फक्त बाबांचा चेहरा... !!! वाटेत पुन्हा एकदा फोने वाजला... कशीबशी गाडी बाजूला घेत पुन्हा फोन कानाला लावला... ''बाबांचा पाय मोडला आहे आणि हॉस्पिटल मध्ये आता आम्ही नेलेले आहे बधुदा operation करावे लागेल.. तू लवकर ये... '' पुन्हा फोन शांत झाला... भेसूर या शब्दाचा अर्थ त्या शांतेत गवसला.. पुन्हा गाडीला किक मारली आणि त्याच वेगाने गाडी पळवायला सुरुवात...!!! आजवर नुसतं नाव वाचलेल्या सुयोग हॉस्पिटल मध्ये गेलो... पाहतो तर बाबांचा पाय fracture मध्ये गुंडाळलेला... वेदना प्रचंड होत असाव्यात पण बाबा चेहऱ्यावर काहीही दिसू देत नव्हते... मी काही क्षण फक्त पायाकडे पाहत राहिलो.. माझ्या मनातील गोंधळ त्यांच्या मनापर्यंत पोहोचला असावा.. तत्काळ हसत बाबा म्हणाले.. आरे काहीही झालं नाहीये मला... पायाच्या fracture कडे बोट दाखवत ते म्हणाले, ''याला केवळ पायाभरणी म्हणतात...'' त्याक्षणी पाय जोराने ठणकत असतानाहि त्यांच्या जागृत असलेल्या विनोदबुद्धीला दाद द्यावी... कि नक्की काय करावं हे मला सुचेना.. मी कसनुसं हसलो... एवढा वेळ रोखलेला आईचा बंध मी आल्यावर मात्र फुटला... आईला रडताना पाहून बाबांनी माझ्याकडे हळूच एकदा पहिला.. मला आता जणू त्यांच्या मनातले समजले होते... मी आईला धीर दिला आग काही काळजी करू नको.. मी आलोय ना...
नक्की काय घडलंय हेच मला अजून समाजाला नव्हतं... आईनेच मला घडलेला सगळा प्रकार डोळे पुसत सांगितला... जवळच्याच एका नातेवाईकाला त्याच हॉस्पिटल मधून पाहून आई बाबा बाहेर पडले होते... लगेच घरी जाण्याऐवजी थोडा वेळ गप्पा मारू म्हणून तिथल्या एका कट्ट्यावर बसले आणि नंतर रस्ता क्रॉस करून पुढे जाणार तोच एका दुचाकीवरून भरधाव आलील्या मुलीने बाबांना जोरात धडक दिली बाबा एका बाजूला जाऊन पडले आई देखील त्या धक्क्याने पडली,,, आईला पडलेले पाहून तिला उचलायला बाबा उठायचं प्रयत्न करू लागले पण त्यांना उठताच येईना... पाय चांगलाच दुखायला लागला आणि सुजायालाही... काहीजण मदतीसाठी धावले खरे पण तितक्याच वेगाने पान्गलेही... अखेर ओळखीच्याच एकाने त्यांना हॉस्पिटल मध्ये नेले..''... आई बांध फुटल्यासारखी सांगत होती...''आम्हाला काही क्षण कळलेच नाही काय होतंय ते... काळ येणा म्हणतात ना... तेच असावं बहुदा...''
डॉक्टर आले ते हातात एक्स-रे घेऊनच... त्यांनी पायाचा दोन्ही बाजूचा एक्स-रे दाखवत सांगितले कि पायाचे हाड एका ठिकाणी सरकले आहे आणि एका ठिकाणी तुटले आहे... operation करावेच लागेल.. दुसरा पर्याय नाही.. पाय टेकवून चालण्यासाठी त्यांना किमान ६ महिने तरी लागतील.. मी आणि आईने एकमेकांच्या डोळ्यात फक्त पहिले.. आता परीस्थीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नव्हता... डॉक्टर म्हणाले तुम्ही निर्णय कळवा.. ok असेल तर लगेच करूयात operation .
अजून एखाद्या तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्यावा म्हणून काही मित्रांना फोन केले.. काहींनी खूप मदत केली काहींनी अलगद अंग काढून घेतले.. काहींनी चटकन मदतीचा, पैशांचा हातही पुढे केला... काहींनी insurance किती आवश्यक या विषयावर तासही घेतले... ३ तज्ज्ञ डॉक्टरांशी बोललो आणि त्यांचा निर्वाळा एका क्षणात एकच होता.. opration शिवाय पर्याय नाही...
संचेती हॉस्पिटल मध्ये देखील एका डॉक्टर ना भेटायला गेलो... opd मध्ये हात आणि पाय मोडलेले असंख्य जण होते.. अनेकांची परिस्थिती तर खूपच भयानक होती...त्यात अगदी दीड वर्ष्याच्या चिमुकल्या मुलांपासून ते अगदी सत्तरीच्या आजोबापर्यंत.. प्रत्येकाचे काही ना काही मोडलेले.. एक दुर्लक्ष झालेला क्षण नेमका डाव साधून गेलेला दिसत होता.. वेदना प्रत्येकालाच होत असणार तरीही त्या हॉस्पिटल मध्ये चैतन्य होते.. बाबा सहन करतील हा विश्वास मला तिथल्या वातावरणाने दिला..
डॉक्टरना आम्ही कळवले कि operation करूयात.. त्यांनी तयारी सुरु केली मी बाबांना पूर्वकल्पना असावी म्हणून त्यांच्या बाजूला बसून सांगितले. त्यावर मला वाटले, कि आमच्या कुणाच्याही दुखण्याला घाबरणारे... त्याबाबतीत नको इतके हळवे असणारे बाबा थोडे तरी अस्वस्थ होतील. पण त्यांनी पुन्हा उलट मलाच धीर दिला..
opration पूर्ण होईपर्यंत आई खूप अस्वस्थ राहणार हे ओळखून मी माझ्या सतत हसतमुख असलेल्या मित्राला बोलावले.. त्याने वातावरणातील ताण खरच सैल केला खरं पण एक तास उलटला तरी operation संपेना तेव्हा सगळ्यांनाच थोडा ताण आला... दीड तासानंतर बाबाना बाहेर आणलं तेव्हा ते अगदी फ्रेश होते... दुख अगर वेदना यांचा लवलेशही कुठे दिसत नव्हता आणि तो दिसतोय का हे शोधायची आमची धडपड सुरु होती... पण बाबांच्या मनाचा थांग सापडणं इतका सोपं नाही हे एव्हाना आम्हाला कळायला हवा होता... रूम मध्ये आणताच त्यांना सलाईन लावण्यात आले... बाबा लगेच म्हणाले... ''आता यांचे ठिबक सिंचन सुरु झाले..'' सगळे हसले आणि वातावरणही एका क्षणात बाबांनी हलके केले...
बाबांना मी जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून नुसतं बसलेला कधीच पाहिलं नाही.. कार्यमग्न हा शब्द जिवंत जगताना मी पाहिलेला आहे.. पहाटे ३ वाजल्या पासून सुरु होणार त्यांचा दिवस आता बदलनार.. त्यावर खूप मर्यादा येणार.. आणि एक पाय न टेकवता इतके महिने राहायचे म्हणजे बाबांची किती चिडचिड होईल याची आम्हाला कल्पनाच करवत नव्हती... पण आमच्या कल्पना आणि बाबांनी स्वीकारलेल वास्तव याचा ताळमेळ बसूच द्यायचा नाही असं बाबांनी ठरवलं असावं... बाबा घरी परत आले त्या दिवसापासून कसलीही कुरकुर नाही.. वेदनेने चिडचिड नाही.. आपण काळजीने पाहायला जावा तर तेच म्हणतील... काही नाही रे... होत आला बरा आता...
मला कधीतरी पायाला लागलेला तेव्हा अस्वस्थपणे येरझार्या घालणारे बाबा... माझ्या आजारपणात रात्र रात्र जागून माझ्या डोक्यावर गरम पाण्याच्या घड्या ठेवणारे बाबा... खेळून खेळून दमल्यावर पायाला तेल लाऊन चोळून देणारे बाबा... काम करून दमलेल्या आईच्या पाठीवर हाथ फिरवून देणारे बाबा... पहाटे लेखनात गढून गेलेले बाबा.. सकाळी चूल पेटवण्यात रमून गेलेले बाबा... wwf च्या कुस्त्या पाहण्यात रंगून गेलेले बाबा... अशी कितीतरी त्यांची रुप माझ्या डोळ्यासमोर पण आता walker घेऊन लंगडत चालणारे बाबा काही पाहवत नाही. वनातला सिंह एका बाजूला गुपचूप बसलेला पाहवत नाही ना तसंच हे... पण प्रत्येक बदलाशी आणि येणाऱ्या परिस्थितीशी कसा जुळवून घायचं हे बाबांनी त्यांच्या जगण्यातून शिकवलं.. ६ महिनेच काय ते ३ महिन्यात पुन्हा चालू फिरू लागतील हा विश्वासही त्यांनीच आम्हाला दिला... दुखाचा फार बाऊ न करता त्याला सामोरे कसे जायचे हे देखील त्यांनीच आम्हाला शिकवले.. परिस्थिती बदलली म्हणून साधनेत खंड न पडू देता... वाचन लेखन सतत कसे सुरु ठेवायचे हे देखील याच काळात आम्ही शिकलो... मधुमेह आणि रक्तदाब यासारखे दोन शत्रू सतत सोबत असताना देखील.. त्यावर मात करण्याऐवजि कसे पुढे जात येते हेदेखिल् शिकवले ... अशा कितीतरी गोष्टी.. नियमित बँकेत जाणे, पोस्टात जाऊन लगेच पत्र टाकणे, वेळेत कुरिअर करणे इथपासून ते चूल पेटवणे.. नराला पाडणे अशा बाबांच्या अनेक जबाबदार्या मी खांद्यावर घेतल्या खर्या पण असे बाबा होणं मला काही जमेल असं वाटत नाही... बाबांच्या राशीमधील सिंह त्यांच्या रक्ताठी पुरेपूर भिनलेला असावा.... बाबांना पुन्हा चालताना पाहण्यासाठी डोळे मात्र आसुसलेत हे बाकी खरं... डोळ्याभोवती अश्रूंचा पडदा वाढायला लागला कि थांबावं....

--
always think positive....!