फॉलोअर

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

माझा दोस्त...!!



दोस्त या शब्दाला जो आवेग आहे.. तो इतर कुठल्याही समानअर्थी शब्दात येऊ शकत नाही... पण या शब्दाचा अर्थ अगदी मनापासून येऊन भिडला तो आज.. तो माझ्या जवळ आला.. अगदी निरागस हसला.. आणि मला घट्ट मिठी मारली... दोन सेकंद काय होतंय हे समजण्यासाठी गेले... पण मी त्याच्या मिठीतली निरागस, निस्वार्थ उब मी अनुभवली.. आणि एक निराळा निशब्द संवाद सुरु झाला... समाजाच्या दृष्टीने 'तो' मतीमंद... ते उपेक्षित आहेत याची आपल्याच मनाशी समजूत काढण्यासाठी दिलेला आणि एक शब्द म्हणजे विशेष... ती विशेष आहेत याचा छुपा अर्थ आमच्याबरोबरची नाहीत असाच...!!.. रूढार्थाने अंगवळणी पडलेले हे शब्द का कोण जाणे मला अजिबात वापरावेसे वाटत नव्हते.. पण आज त्या मिठीने मला अगदी जवळचा शब्द मिळून दिला... दोस्त...!
कामयानी या संस्थेत अशा काही दोस्तासमावेत मैत्रीदिन साजरा करावा अशी एक कल्पना पुढे आली आणि सार्यांनीच उचलून धरली.. त्या मुलांना आवडेल असे काहीतरी घ्यावे म्हणून काही काही घेऊन गेलो..मी, दीपा, धनश्री, राहुल, हीना, प्रिया, दीपक, पाध्ये असे सारेजण दुपारी कामायनी मध्ये गेलो... शाळा एव्हाना सुटायची वेळ जवळ आली होती.. त्यांचे एक शिक्षक आम्हाला एका वर्गात घेऊन गेले तिथे केस पिकलेली पण मानाने मुलच असणारी मुले गणवेश घालून काम करण्यात गुंग झाली होती... हे कोण पाहुणे आले अशा काहीशा नजरेने ते आमच्याकडे पाहत होते.. अवघ्या ५ मिनिटात १०० हून अधिक दोस्त जमा झाले.. आता काय याची उत्सुकता प्रत्येक मुलांच्या नजरेय होती... अनेकांच्या हातात अगोदरपासुनच मैत्रीचे धागे होते पण नवे दोस्त मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून अक्षरशः ओसंडून वाहत होतं... सारी मुले गोल रिंगण करून उभी राहिली आणि मध्ये आम्ही...!! इतरापेक्षा आपण वेगळे आहोत असं म्हटल्यावर की वाटत असेल याची जणू ती झलकच होती.. पण आम्ही स्वताला सावरलं आणि त्या मुलामध्ये रमायचा प्रयत्न करू लागलो.. पण खरं संग्याचा तर आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हि जाणीव सुप्तपणे आतून टोचत होतीच त्यामुळे सुरवातीला ते मिसळणहि नैसर्गिक नव्हतं... पण वातावरण त्याच मुलांनी मोकळं केलं... अगदी सहजतेने दादा, ताई, मावशी, काका अशा हाक सुरु झाल्या... त्यांच्या कोवळ्या हातात धागे बंधू लागलो तसा त्यांच्या चेहर्यावरचा आनंद लपेना... हातात हात घेऊन, निरागस हसत ते आपले भाव व्यक्त करत होते... ''माझं नाव प्रदीप.. तुझं??'' असं अगदी हक्काने विचारत होते... आम्ही सुरवातीपासून जपलेले एक हाताचे अंतर त्यांनीच एका क्षणात कमी केले होते... आवडलेल्या प्रत्येक गोष्टीला टाळ्या वाजवून दिलखुलास दाद देत होते..
हे सगळे सुरु असतानाच मुलांमधल्या गर्दीतून वाट काढत तो माझ्याजवळ आला... शब्दांची जुळवाजुळव करून मी काही बोलू पाहणार इतक्यात तो हसत न बोलता माझ्या मिठीत शिरला... वयाने मोठा परंतु तरीही निरागसतेच अमृत जपलेल्या त्याला मिठीत घेतलं आणि पाठीवरून हात फिरवला तेव्हा मला माझ्या दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेतल्याची उब जाणवली... शब्दाविना स्पर्श खूप काही बोलून जातो तो असा...!!!
पुन्हा नक्की भेटण्याचे आश्वासन देत आम्ही निघालो पण हि सारी मुले मनातून काही केल्या जाईनात. बाहेर आलो तेच प्रत्येक जण आतून शांत होता... काहीतरी दिलं म्हणण्यापेक्षा स्वतःलाच काहीतरी गवसला होत.. खूप काही करता येण्यासारखं आहे... खूप काही करूयात.. असे निर्धारही झाले.. पण मनातल्या कोरड्या ठाक पडत चाललेल्या जमिनीवर या मुलांनी निशब्दपणे पाणी शिंपडले.. आणि आशेचा नवा अंकुर मात्र मनात रुजला ... निरागसतेने मैत्रीचा हात पुढे केला होतां आता तितक्याच जिंदादिलपणाने त्याला प्रतिसाद देणं आमच्या हाती होत...
या दोस्ताना आनंदाचे काही क्षण देण्यासाठी म्हणून आम्ही गेलो खरे पण त्यांनीच आम्हाला आनंदाची ठेव दिली... !!
त्यांच्याहि आठवणीच्या कप्प्यात आम्हाला एक 'विशेष' जागा मिळेल??.. नक्कीच...!!!!