फॉलोअर

शनिवार, ९ जुलै, २०११


'सहावा' दरवाजा बंदच राहू द्या..
पद्मनाभ मंदिरामध्ये १ लाख कोटी रुपयांची संपत्ती सापडली हि बातमी गेल्या आठवड्यापासून गाजते आहे.. सत्य साईबाबा तुलनेत अगदीच गर्रीब बिच्चारा वाटावेत इतकी प्रचंड संपत्ती या एकाच ठिकाणी सापडलेली आहे...
सत्य साईबाबांच्या संपत्तीचे नवनवे आकडे समोर येत असताना, केरळमधील तिरुवनंतपुरम येथे असलेल्या पुरातन पद्मनाभस्वामी मंदिराची संपत्ती त्यावर कडी करेल, असे दिसत आहे. या संपत्तीची मोजदाद सुरू असून ती किमान एक लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

योगनिदेच्या रूपात असलेल्या विष्णुचे हे मंदिर फार पुरातन असे मंदिर आहे... सहाव्या ते नवव्या शतकातील तमिळ संतांच्या साहित्यात या मंदिराचा उल्लेख आढळतो. वैष्णवांच्या पवित्र स्थानांपैकी महत्त्वाचे स्थान म्हणून या मंदिराला महत्वाचे मानले जाते.. अठराव्या शतकापर्यंत त्याचा जीणोर्द्धारहि करण्यात आलं होतं...
या मंदिरात असलेल्या संपत्तीची सुरक्षा करण्यास मंदिर समर्थ नाही. त्यामुळे या मंदिराच्या कारभाराची जबाबदारी सरकारने घ्यावी,' अशी जनहित याचिका टी. पी. सुंदरराजन या स्थानिक वकिलाने केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पद्मनाभ मंदिरातील सहा बंदिस्त खोल्यांचे दरवाजे उघडून संपत्तीची मोजदाद करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मंदिराचे एक एक दरवाजे उघडून त्यातील संपत्तीची मोजदाद करण्याचे काम सुरु झाले... केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश एम. एन. कृष्णन यांची मोजदाद समिती नेमण्यात आली असून या समितीने मोजदाद सुरु केली... या मंदिराचा कारभार अजूनही त्रावणकोरच्या राजघराण्याकडेच आहे.

कुबेराची संपत्ती....!!!
* सोन्याचे तीन मुकुट, सोन्याने आणि रत्नांनी मढवलेल्या सहा पट्ट्या, सोन्याचे हिरेजडित पंधरा फुटी हार (प्रत्येक हार दहा किलो वजनाचा), सोन्यात घडवलेल्या देवांच्या मूर्ती, चार फूट उंचीची सोन्याची हिरेजडित विष्णुमूर्ती, सोन्या-चांदीची असंख्य नाणी, महागडी भांडी, हिरे-माणिक-मोती अशी संपत्ती आतापर्यंत सापडली आहे.
* पाच हजार कोटींच्या संपत्तीची मोजदाद पूर्ण झाली. एकंदर संपत्ती एक लाख कोटी रुपयांची (२२.३ अब्ज डॉलर) असल्याचा अंदाज. त्यापैकी पन्नास हजार कोटी रुपयांचे दागिनेच असल्याचा आडाखा.
* गेले दोन दिवस सुरू असलेली मोजदाद पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता. १८८० मध्ये या मंदिराच्या दोन खोल्या उघडल्या होत्या, त्यावेळी कोट्यवधींची संपत्ती सापडली होती. ही संपत्ती जमिनीच्या खाली वीस फूट खोल लपवली होती.

त्रावणकोरच्या महाराजांची संपत्ती शत्रूपासून लपविण्यासाठी मंदिरात भुयार करून तेथील खोल्यांमध्ये शाही खजिना दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी लपवण्यात आला असावा.
जरा करूया तुलना...
* देशाचे बजेट : १२,५७,७२९ कोटी रुपये
* आरोग्यासाठीची तरतूद : २६,७६० कोटी रुपये
* शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद : ५२,०५० कोटी रुपये
* भारतावरील कर्ज : सुमारे १५ लाख कोटी रुपये (२०१०-११)
* महाराष्ट्राचे बजेट : ७,६५४ कोटी रुपये (२०१०)
* मुकेश अंबानींची संपत्ती : १,३५,००० कोटी रुपये
हा सगळा झाला आजवरच्या घडामोडींचा निव्वळ आलेख... खरं मुद्दा या पुढेच आहे... या पद्मनाभ मंदिराचा सहावा दरवाजा उघडावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत... आत्तापर्यंत जितकी संपत्ती सापडली आहे त्यापेक्षाही अधिक संपत्ती या सहाव्या दरवाज्याच्या आड लपलेली आहे असं अनेकांचा कयास आहे... पलीकडे संपूर्ण सोन्याने भरलेली नाव, सोनेभरून राहिलेल्या विटा ब त्याने भरलेल्या विहिरी आणि अजून कित्येक अंदाज बांधले जात आहेत... या दरवाज्यापलीकडे किमान ५ लाख कोटी पेक्षा अधिक संपत्ती असावी असं अनेकांचा अंदाज आहे... तर दुसर्या बाजूला काहीही झाले तरीही हा शेवटचा दरवाजा उघडू नये अशी राजघराण्याची, पुजार्यांची श्रद्धा आहे... सहाव्या दरवाज्यावर असणाऱ्या नागाच्या मूर्ती रक्षक असून त्यांना ओलांडणे शुभ नाही... इथपासून ते सहावा दरवाजा उघडला तर थेट समुद्रामध्ये जातो.. साम्द्राचे पाणी त्यात शिरून मंदिरच पाण्याखाली जाण्याची भीती आहे... मंदिराचा आधार सहाव्या दरवाजात आहे.. तो उघडल्यास तो आधारच नाहीसा होऊन मंदिर कोसळू शकते अशी भीती वर्तवली जात आहे...

परंतु घटना, घडामोडी, परिस्थिती, अंदाज या सर्वांच्या पलीकडे जाऊन या पद्मनाभ मंदिराच्या घटनेकडे पाहायचा प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते... या मंदिराची घटना आपल्याला काही सांगू तर पाहत नाही ना... थोडासा थांबून याचा विचार व्हायला हवा असे वाटते... समाजात विविध स्तरावर निर्माण झालेल्या बजबजपुरीमध्ये पद्मनाभ मंदिराची घटना खूप काही सांगून जाणारी आहे.. त्यातून आपण काही बोध घेतो का हे मात्र फार महत्वाचे आहे...

समाजात अशांतता, अस्वस्थता भरून वाहत असताना.. एका आकस्मिक संधीच्या रूपाने पद्मनाभ मंदिरातील संपत्ती उघड झाली.. इतकेच नव्हे कुणी कल्पनाही केली नसेल इतकी म्हणजे १ लाख कोटी रुपये... इतकी प्रचंड संपत्ती दिली.. अर्थात निसर्गाने देतात्ना पुन्हा हाथ आखडता घेतला नाही... नेहमीसारखेच भरभरून दिले... पण इतके हाती येऊनही आम्हाला सहाव्या दरवाज्याची हाव सुटत नाही... पाच दरवाजे उघडून अमाप संपत्ती मिळूनही साधन नाही.. अजून हवेच... या हावरटपणाने सहावा दरवाजा उघडावा आणि अधिक संपत्ती मिळवावी हि सुप्त हाव दिसून येत आहे...!!

मला वाटतंय कि तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच जीवनात अनेक पावलावर हा सहावा दरवाजा येत असतो.. कुठे थांबायचे हे आपल्या आयुष्यात आपल्याला समजले कि पुढची फरफट थांबत असते.. आज नेमके हेच समाजात नसल्याने आपण सारेच नुसते मिळवण्यासाठी धावत आहोत.. पण समाधान कोणत्याच पातळीवर होताना दिसत नाही.. पद, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान, या सार्याच्या मागे बेभान होऊन धावतो.. मिळू लागले कि समाधानाची वृत्तीच गायब होते आणि मग आणखी हवे चा एक वाईट हव्यास सुरु होतो... अपेक्षा बाळगणं वाईट नाही पण दिशा विसरून अपेक्षान्मागे पळत राहणं खरच चुकीचा आहे... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सध्या एक नवा सहावा दरवाजा आपल्याला ठोठावतो आणि स्वताकडे या ना त्या प्रकाराने आकर्षित करतो.. पण आपण तिकडे जायचे कि समाधानी वृत्ती बाळगून आनंदी राहायचे हे अखेर आपल्याच हाती असते...

तेव्हा त्या पद्मनाभ मंदिरातील संपत्तीचे काय व्हायचे ते होवो पण आपल्या मनातील असंतुष्टपानाचा, असमाधानाचा, असंतोषाचा, अविवेकाचा... हा सहावा दरवाजा आपण बंदच ठेऊया.. मला वाटतं पद्मनाभ मंदिरातील घटनेचा यापेक्षा सुंदर बोध असू शकत नाही...

पराग पोतदार