फॉलोअर

शनिवार, ७ जुलै, २०१२

गुगलवर  सर्च मारत मी एकटाच बसलो होतो ..
जग जवळ मानून 'व्हर्चुअल' जगाला फसलो होतो..

माहितीच्या जळमटात एकेका धाग्याने गुंतत होतो..
इथे हवं ते मिळतं असं मुकाट मानून बसलो होतो.. 

आवाज होत होता तो फक्त क्लिक आणि टकटकचा...
तिथूनच कुणीतरी साद देईल अशा वेड्या आशेचा 
कुणीतरी कानाशी कुजबुजले..

गुगल अर्थ वर म्हणे जग दिसते..

एका क्लिक वर दिसतात तिथे पृथ्वी, देश आणि पुणे 
एकही माणूस दिसत नाही एवढेच काय ते उणे !!

गुगलच्या जगावर दिसत होते माझ्या घराचे अंगण 
पण शोधूनही सापडले नाही तिथलेच तुळशी वृंदावन

गुगल अर्थ च्या दुर्बिणीतून सारी धरती दिसली..
सगळं सोबत असूनही कळेना अनामिक ओढ कसली..!!


कुमार माधवन 





सोमवार, ११ जून, २०१२

अरे अशी कुठे असते का शाळा.. ???


तुला शाळेत घालायचे याची तयारी आम्ही किती दिवसांपासून करतोय..
तू शाळेत पहिलं पाऊल टाकणार हा आमच्यासाठी किती आनंदाचा क्षण..
कालपर्यंत तू घर भर आनंदाचे माणिकमोती पसरत होतास 
आता जगाच्या आकाशाखाली पहिल्यांदा उभं राहून स्वतासाठी पहिलं पाऊल टाकणार..

किती आवडीने सगळी तयारी करत होतो रे  
तुझ्यासाठी तुला आवडेल असं छानस छोटं दप्तर आणलं.. 
तुझ्या चीमुल्कल्या बोटात  मावतील  असे  रंगीत खडू आणले..
तुझा शाळेचा ड्रेस आणला... तुझ्या आईने तुझ्या सार्या वह्या-पुस्तकांना कव्हर घातली.. 
तुझ्या दप्तरावर आणि तुझ्या ओळखपत्रावर तुझा छोटुसा फोटो लावताना किती छान वाटत होत..
तू शाळेच्या पहिल्या दिवशी घाबरू नयेस.. रडू नयेस.. म्हणून किती धडपड.. 
रोज गाडीवर बाहेर पडल्यावर तुला तू ज्या शाळेत जाणार ती शाळा दाखवत होतो..
भिंतीवर रंगवलेले जिराफ आणि फुलं दाखवून तुझ्या मनात शाळेची गोडी निर्माण करायचा प्रयत्न करत होतो..
शाळेत गेलं कि रडायचं नाही हे तुझ्या कोवळ्या मनाला सारखं बजावत होतो...
शाळेत इतर मुलं रडली तर त्यांना तूच समजवायचं असं मोठेपणहि कारण नसताना लादत होतो..

तू पण म्हणालास...
''मी शान्गेन बाबा शगल्याना.... ललू नका.. मी आहे न.. मी गाने म्हनून दाखवेन ना...''
इतके गोड वाटत होते तुझे बोल...

आणि शाळेचा तो पहिला दिवस उगवला.. 
तुला छान तयार केलं.. शाळेचा घडी न मोडलेला ड्रेस तुला घातला..
तुही सारे कसे मजेने करत होतास.. 
हसत होतास..
शाळेच्या दारात पोचलो.. आणि अगणित चिमुकल्यांचा एकच रडण्याचा आवाज कानावर आदळला..
तुझी माझ्या मानेभोवाताल्ची मिठी नकळत घट्ट झाली..!! 
तुला मला सोडायच नव्हतं 
आणि मला, 'हसत हसत' तू शाळेत जाताना पाहायचं होतं... 

गेट मधून आत आलो आणि वर्गा वर्गात मुलं नुसती कोंबली जात होती.. 
आई वडिलांच्या हातातून घेऊन त्यांना आत घेतल्या घेतल्या दार लावलं जात होतं.
आतून फक्त हमसून हमसून रडण्याचा आवाज...!!!

तुला मी पण तसंच सोडणार होतो रे .. 
मला तसं सोडायचं नव्हतं तरीही.. 
मी तुला दोन मजले चढून एका वरच्या खोलीत घेऊन गेलो..
तिथून पण असाच नुसता आक्रोश ऐकू येत होता..
रडू नको हा असं तुझ्या आणि नकळत माझ्या मनालाहि समजावत मी वर्गापर्यंत आलो..
आतून कडी लावलेली होती...
मी दार जोरात वाजवल..
किलकिलं होत दार उघडलं... 
भसकन एखादा आगीचा लोळ यावा तसा चिमुरड्यांच्या प्रचंड रडण्याचा आवाज कानावर आदळला..
मी काही बोलणार इतक्यात आतून दोन हात आले आणि चेहराही नीट दिसू न देता माझ्या मुलाला आत घेऊन गेले..
मी सुन्न...!!!
दार बंद होताना त्या निरागस मनाची एक ओझरती दृष्टीभेट झाली.. त्याच्या डोळ्यात क्षणात किती पाणी तरळले होते..
असहाय्यता, हतबलता, भीती, कारुण्य.. आणि कितीतरी खोल होते त्या दोन चिमुकल्या डोळ्यात.. 
माझा श्वास अडकला... मी त्या नजरेला नजर देऊ शकलो नाही.. 
एका क्षणाच्या अंतरात दरवाजा बंद झाला... 
मी काही क्षण तिथेच दरवाजाबाहेर उभा..
रडणाऱ्या त्या कोवळ्या जीवांमध्ये मी माझ्या पिल्लालाही सोडून आलो होतो..
त्या कोलाहलात आता मी माझ्या चिमुकल्याचा आवाज ऐकू पाहत होतो.. 
बंद दरवाजे.. बंद खिडक्या आणि तिथल्या बंद मनांना चिरून हजारो रडणारे आवाज माझ्या कानावर आदळत होते..
आता ते सारे आवाज मला माझ्याच पिल्लाचे वाटत होते...

मी यांत्रिकपणे पायर्या उतरून खाली आलो.. अजून मुलांचे रडणे काही थांबत नव्हते.. 
मुलांसाठी शाळेत बरेच फुगे लावले होते.. दारासमोर रांगोळी काढली होती..
पण मला ते सारे रंग केविलवाणे आणि कृत्रिम वाटत होते..
कारण निरागसपण आतून धाय मोकलून रडत होते...!!!

तीन दिवस रडतात पोर.. नंतर रुळतात...
तोंडातून लाल रस बाहेर काढत गेट बंद करताना कुणीतरी म्हणाला..
साडेदहा शिवाय येऊ नका असं आई बापाला हाकलत तो निवांत गप्पा मारत बसला..
मुलांचे रडण्याचे आवाज त्याला नित्याचे असावेत.. 
रस्त्यावरून धावणाऱ्या असंख्य गाड्याचे आवाज कुणी लक्ष देऊन ऐकतो का.. तसेच हे रडणे कि..
अर्धा तास होत आला मी अजून गेट बाहेरच उभा.. 

मी का सोडलं मुलाला शाळेत..??
त्याच आनंदाचं जग असं हिरावून काही क्षण तरी त्या कोंडवाड्यात डांबण्याचा अधिकार मला कुणी दिला.. ??
किती स्वप्नं दाखवली त्याला आणि फसवून कुठ सोडून आलो त्याला..?? 
त्या कोलाहलात किती भांबावून गेला असेल बिच्चारा...
कंठ दाटून आलेला...
अरे अशी कुठे असते का शाळा.. ??? न राहवून मी बोललो.. आवाज पण कातर झालेला..

माझ्या पिल्लाचे आजी-आजोबा किती कौतुकाने आले होते शाळेत...
दोघांचे पाय दुखत असूनही...
वेळेत पोचले नाहीत म्हणून त्यांना त्याला वर्गात जाताना पाहता आले नाही..
त्यांनी नाही पहिले ते बरेच झाले.. नाही तरी होते काय पाहण्यासारखे त्यात..!! 

खालच्या वर्गातील एक खिडकी अचानक उघडली.. 
अश्रुनी डबडबलेले दोन डोळे आणि मदतीसाठी बाहेर आलेले दोन हात मला दिसले.. 
क्षणात खिडकी बंद झाली आणि खिडकीचा पडदाहि बंद झाला..
हे काय होते.. किती भयानक.. किती अमानुष..??
खरच अशी असते का हो कुठे शाळा..?

घड्याळाचा कसोटी पाहणारा काटा अखेर साडेदहा वर पोचला..
मग शाळा सोडायची का याची परवानगी घ्यायला शिपाई गेला..
करकरत पुन्हा गेट उघडले आणि इतका वेळ रोखून धरलेली मने त्या निरागस जिवाकडे धावली.. 

मी पुन्हा दरवाजासमोर उभा...  गेलेला दीड तास डोळ्यासमोरून गेला..
रडणारा तो चिमुकला चेहरा आठवला.. 
दरवाजा बंद होतानाचे त्याचे भरून आलेले डोळे आठवले.. 
दरवाजा उघडला पण एकदम सगळ्यांना सोडेनात..
दरवाजाच्या कोपर्यात उभा राहून पाहणाऱ्या पिल्लाला अखेर मी दिसलो.. 
माझ्याजवळ यायची तो केविलवाणी धडपड तो करत होता.. 
अखेर मी त्याच्या जवळ गेलो त्याला उचलून घेतला.. 
पुन्हा त्याच बांध फुटला.. मानेवर डोकं ठेऊन रडत राहिला.. 
त्याच्या अश्रुनी मी पुरता भिजून गेलो..  पार आतूनही...!!!

संपली रे बाळा, शाळा.. असं समजावत त्याला बाहेर आणलं
आईच्या जवळ गेला आणि पुन्हा त्याला रडूच फुटलं...
खिशात कोंबलेला एक बिस्किटचा पुडा होता पण त्याला हातही लावलेला दिसत नव्हता...
शाळा आवडली का रे.. ?? माझा एक फालतू प्रश्न... 
''नाही आवडली..'' अपेक्षित उत्तर..

हळू हळू शांत झाल्यावर तो मला म्हणाला..
बाबा, तू मला आत सोडून दार का लावून घेतलं??
मी खूप रडलो.. तुला शोधात होतो मी..
मला अक्षरशा भडभडून आलं..
मी त्याला जवळ घेऊन म्हटलं
मी नाही रे लावलं दार.. ते चुकून लागलं.. मी बाहेरच उभा होतो.. दार दुरुस्त केलं आणि मग उघडलं..
तो म्हणाला... बाबा असं जाऊ नको रे मला सोडून..!!
माझ्याकडे उत्तर नव्हतं...
मी त्याला जवळ घेतला.. पाठीवर झोपवून थोपटलं...
रडून रडून थकलेला तो जीव शांतपणे, विश्वासाने पडून राहिला होता..

शाळेचा पहिला दिवस खरच असं असावा..?
किती स्वप्नं दाखवली होती मी आणि किती भ्रमनिरास झाला असेल त्याचा...

माझ्या हातातून अचानक अनोळखी हातात जाताना तो किती बावरला असेल?
खोलीत सारे अनोळखी जग पाहताना किती वेळा काळजाचा ठोका चुकला असेल?
आई  बाबाला सोडून  पहिल्यांदा  बंद खोलीत ते सारे रडणे अनुभवताना मनात किती बावरला असेल?
चटकन जाऊन बिलगावे अशी जागाच न सापडल्याने किती सैर भैर झाला असेल?..
आतल्या खोलीत कितीही मोठ्या आवाजात कार्टून लावले म्हणून काय त्याचे लक्ष वेधू शकले असेल?
अजिबात नाही...
मग या कोवळ्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस खरच कधी आनंददायी करता येणार नाही का आपल्याला.??
मुलं हळू हळू रुळतात हे मान्य पण ती जुळवून घेतात.. आपण म्हणतो रमली पोर..
पण इतक्या लहान वयात हि अशीच सुरवात करायला हवी?? दुसरे काहीच पर्याय नाहीत? कि आपल्याला याचा विचार करावासाच वाटत नाही इतके आपण असंवेदनशील बनत चाललो आहोत?..

चार भिंतीतून पहिल्यांदा त्यांना बाहेर काढायला हवे..
सहवास, नवी माणसे छान असतात हे त्यांना उमगू द्यावे..
मुलं मुलामध्ये रमतील ना, पण अशी दारं खिडक्या लावून नको..
निसर्गा च्या सोबतीने वर्ग सुरु नाही का करता येणार?
अनोळखी हातात एकदम जाताना ते हात ओळखीचे करून मग नाही का देता येणार? 

खूप नाही बदलावे लागणार.. फक्त थोडी संवेदनशीलता जागवावी लागेल.
चिमुकल्यांच्या मनात शिरून त्यांना काय हवं ते जरा समजून घ्यावं लागेल..

या घडीला मात्र... मी आणि माझ्या पिल्लामधील ती दृश्य-अदृश्य भिंत अजूनही तशीच आहे..
अन डबडबलेल्या डोळ्यांनी तो मला विचारतोय...
बाबा, तू दार का लावलं रे..??
मला नको असं सोडून जाऊ.....!!!!



शुक्रवार, १ जून, २०१२

कोवळे किरण आशेचे...!!!

आयुष्यात काही  क्षण अगदी सहज घडून जातात पण खूप काही सांगून जातात.. मनाला एक दिलासा देऊन जातात.. एक नवा आशावाद जागवतात..

एका प्रकल्पाच्या कामासाठी काही पुस्तकांचे संदर्भ हवे होते.. ग्रंथपाल प्रसाद भडसावळे हा मदतीसाठी कायम तत्पर असणारा माणूस.. ते म्हणाले, मी ज्या शाळेत सकाळी असतो तिथे आलात तर तुम्हाला हवी ती पुस्तके व हवे ते संदर्भ घेऊन जा.. सकाळी १० वाजता मी आबासाहेब अत्रे दिन प्रशालेमध्ये पोचलो.. बाहेरचं धावता जग आणि शाळेत शिरल्यापासून जाणवणारं जग खूप वेगळं होतं त्याहून जेव्हा मी ग्रंथालयात गेलो तेव्हा तिथले वातावरण मला खूप भावले.. विषयानुसार, व्यक्तीनुसार पुस्तके कपाटात व्यवस्थित लावलेली होती.. काही हजार पुस्तके, सर्व प्रमुख संदर्भ ग्रंथ या शाळेच्या ग्रंथालयात पाहायला मिळतील असे बाहेरून वाटणार पण नाही.. पण मला तिथे भावलेली गोष्ट खूप वेगळी होती.. कारण सकाळपासूनच ग्रंथालयात मुलांची वर्दळ होती.. कुणी वर्तमानपत्र वाचण्यात गढले होते तर कुणी अगदी प्रामाणिकपणे कात्रणे काढून त्या त्या विषयाची वही चिकटवून तयार करत होते.. अनेक जण पुस्तके वाचण्यामध्ये मग्न झालेली दिसत होती.. ते वातावरण कुणालाही पाहून छान वाटावे असेच होते.. मला हवी असणारी संदर्भाची पुस्तके भडसावळे यांनी काढून दिली. एका पुस्तकाचे काही संदर्भ घेण्यासाठी मला त्याच्या xerox  हव्या होत्या... माझा वेळ वाचवा म्हणून त्यांनी एका चुणचुणीत मुलाला आवाज दिला.. पुस्तकाची जेवढी पाने हवी होती ते क्रमांक मी त्याला लिहून दिले. त्यासाठी दहा रुपयांची एक नोट त्याच्याकडे दिली.. तो गेला. पंधरा मिनिटात परत आला. मला हवी असलेली पाने त्याने हातात दिली.. भडसावळे यांचे आभार मानून मी ऑफिसला परत आलो.. एव्हाना सकाळचे बारीक सारीक तपशील मी केव्हाच विसरून गेलो होतो..
...................................................................................................................................................................
संध्याकाळी मला भडसावळे पुन्हा दिसले.. त्यांनी मला हाक मारून थांबवले आणि माझ्या हातात २ रुपयांचे नाणे ठेवले.. म्हणाले.. सकाळी तो मुलगा xerox काढायला गेला होता. तुम्ही गेल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि आपण उरलेले पैसे दिले नाहीत. तेव्हा त्याने ते पैसे माझ्याकडे दिले आणि म्हणाला सरांना हे पैसे आठवणीने द्या नाहीतर त्यांचा गैरसमज व्हायचा...''
दोन मिनिटे मला ते पैसे घ्यावे कि न घ्यावे हे सुचेना. पण नंतर मला त्या मुलाच्या वृत्तीचे खूप कौतुक वाटले.. मी त्या मुलाला त्यावेळी पैशांचा हिशोब विचारला नव्हता.. परत काही पैसे येणार आहेत हे माझ्या ध्यानी मनी पण नव्हते..दिवसभराच्या धबडग्यामध्ये हे असले काही मनात पण नव्हते.. पण त्या मुलाचे मात्र मला मनापासून कौतुक वाटले.. मी मुद्दाम त्याचे नाव विचारले. सौरभ परदेशी हा इयत्ता ७ वीत शिकणारा मुलगा.. गरीब कुटुंबातून आला असला तरी या प्रसंगातून त्याचा प्रामाणिकपणा दिसून आला.. पैशापलीकडे काही असते आणि तेच महत्वाचे हा संस्कार निदान लहानपणी तरी त्याच्या मनावर कोरला गेला होता..
...................................................................................................................................................................
ते दोन रुपये मी आजही जपून ठेवले आहेत...!!
अजून सारेच संपले नाही हा दिलासा ते दोन रुपये मला देतात..!!!

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

देवदूत....!

कुलकर्णी नावाचं एक वृद्ध जोडपं आमच्या सोसायटी मध्ये आहे.. त्यांना मुल बाळ कुणीच नाही.. काही दिवसांपासून कुलकर्णी आजींना बरा वाटत नव्हतं.. त्या खूप थकलेल्या वाटत होत्या.. विचारलं तर आजकाल जेवणच जात नाही असा म्हणत होत्या.. हो नाई म्हणत एक दिवस डॉक्टर कडे गेल्या तर तपासणी मध्ये पोटात एक विचित्र असा मासाचा गोळा तयार झालं होता.. तो काढून टाकावा असे डॉक्टरनी सुचवले.. पण पुढची धावाधाव करायची तर घरात कुणीच हक्काचं नाही.. आजोबांचे वय ८० तर आजी ७५ च्या... आता करायचे काय हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता.. कुणाकडे मदत मागणार आणि इतका वेळ तरी आहे कुणाकडे??... आजीनी काही दिवस तसेच काढले.. पण दुखणं वाढत चाललेलं... अखेर जवळच राहणाऱ्या नलावडे यांनी त्यांना त्यांच्या मुलाकडे उपचार घेण्यास सांगितले. सुरवातीला नाव प्रतिथयश नसल्याने त्या थोड्या द्विधा मनस्थितीत होत्या पण पुढे त्यांनी तिथे उपचार घायचा निर्णय घेतला.. उपचार सुरु झाले.. शस्त्रक्रिया यशस्वी झाली.. पोटातील तो अनावश्यक भागही काढून टाकला पण हॉस्पिटल हे दुसरे घरच वाटावे इतकी अनपेक्षित आत्मीयता आणि आस्था तिथे अनुभवायला आली... कारण एकच होते डॉक्टरनि सर्वाना सांगितले होते कि उपचारासाठी आलेली माझी आई आहे..!! तेव्हा तिची सर्वांनी मनापासून काळजी घायची... उपचार सुरु झाल्यापासून डॉक्टर नियमितपणे यायचा. आजीच्या पाठीवरून प्रेमाने हाथ फिरून विचारायचा... आई, बरा वाटतंय ना?.. लवकर जायचं आपल्याला घरी...!! रुग्न्यालयात नर्स मोकळे पणाने चौकशी करत होत्या. वेळोवेळी होणार्या तपासण्या, चेक अप या वेळी त्यांना सारेच जण आपुलकीने वागवत होते.. पुण्यात अन्य कोणत्याही रुग्णालयात सहजासहजी येणार नाही असा अनुभव त्यांना तिथे येत होता .. अर्थातच उपचाराला प्रतिसाद देत आजी लवकर बर्या झाल्या.. डॉक्टर खरोखर मुलासारखा वागला.. बर्या झालेल्या आजीना घरी सोडायला आला.. पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निरोप घेऊन गेला.. स्पर्धेच्या, धकाधकीच्या युगात, माणूस माणसाला आणि माणुसकीला पारखा होत असताना हे उदाहरण फारच वेगळे वाटते ना...!!! प्रत्येक वृधामध्ये आपले आई वडील दिसले तर त्यांचा जगणं आणि दुखणं किती सुखी होईल ना...!!!